desk | washim
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांच्या पिकांनाच बसलेला नाही, तर शेतीशी जोडलेल्या अनेक व्यवसायांचेही अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. शेतीची मशागत, काढणी आणि शेतमालाची वाहतूक यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रॅक्टर व्यवसायावरही दुष्काळाचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने ट्रॅक्टर चालकांना मिळणारी कामे कमी झाली असून, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मेकॅनिक आणि त्यांच्या कुटुंबांसमोरही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार परिसरात ट्रॅक्टर चालक आणि मेकॅनिक यांच्याशी संवाद साधला असता दुष्काळाची ही परिस्थिती समोर आली. शेतकऱ्यांकडे पीकच नसल्याने ट्रॅक्टरच्या कामांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. सोयाबीनचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याने काढणीसाठी ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरला मिळणारे कामही कमी झाले आहे.ट्रॅक्टर चालकांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनला अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. मोठ्या हार्वेस्टरमुळे कमी दरात काढणीची कामे होत आहेत, तर दुसरीकडे ट्रॅक्टरच्या हप्त्यांचा आर्थिक भार कायम आहे. त्यामुळे ट्रॅक्टरची कर्जाची किस्त कशी भरायची आणि दिवाळी कशी साजरी करायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे काही ट्रॅक्टर गेल्या अनेक दिवसांपासून कामाविना उभे आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणीच केलेली नाही, तर अनेकांकडे काढण्यासाठी पीकच उपलब्ध नसल्याचे चालक सांगतात. पाण्याअभावी आगामी रब्बी हंगामातील मशागतीची कामेही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात ट्रॅक्टर व्यवसायावर आणखी मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर चालकांनी सरकारकडे कर्जाच्या हप्त्यांना किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. तसेच ज्यांनी ट्रॅक्टर कर्जावर घेतले आहेत, त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशीही त्यांची अपेक्षा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी किमान 30 ते 40 हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणीही काही चालकांनी व्यक्त केली. दुष्काळाचा परिणाम ट्रॅक्टर मेकॅनिक व्यवसायावरही झाला आहे. शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर चालकांना काम आणि उत्पन्न मिळाले, तरच त्यांच्याकडून मेकॅनिककडे दुरुस्तीची कामे येतात. मात्र ट्रॅक्टर व्यवसायालाच उत्पन्न मिळत नसल्याने मेकॅनिकच्या व्यवसायावरही त्याचा थेट परिणाम झाला आहे. “ट्रॅक्टरवाले कमावतील तर आम्हीही कमावू आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल,” अशी भावना मेकॅनिकांनी व्यक्त केली. शेतकरी हा शेतीव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांना मदत मिळाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या ट्रॅक्टर चालक, मेकॅनिक आणि शेतमजुरांनाही त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच आहे; मात्र त्यासोबतच शेतीभोवती उभ्या असलेल्या ट्रॅक्टर, मेकॅनिक आणि इतर छोट्या व्यवसायांचेही आर्थिक चक्र थांबू लागले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या या व्यवसायांकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
