Desk | bhandra
भंडारा : भात उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात यंदा कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मोहाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून शेकडो हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली. मात्र पावसाने महिनाभर दडी मारल्याने आणि सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने कापूस पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मोहाडी तालुक्यातील अनेक शेतांमध्ये कापसाची झाडे वाळू लागली असून कापसाची बोंडे गळत आहेत. फुलगळही मोठ्या प्रमाणात होत असल्याने पीक हातात येण्याची शक्यता कमी झाली आहे. पावसाअभावी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी औषधे, कीटकनाशके आणि खतांची फवारणी केली. मात्र गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्याने फवारणी केलेल्या औषधांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शेतात टाकलेले खतही पावसाअभावी प्रभावीपणे काम करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. कापूस विकल्यानंतर आर्थिक उत्पन्न मिळेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीत मोठी गुंतवणूक केली होती. मात्र आता पीकच वाळत असल्याने उत्पादनाचा खर्चही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. औषधे, खते, मजुरी आणि इतर खर्च मिळून एका एकरासाठी तब्बल 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादन हातातून गेल्यास कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, पाणी उपलब्ध नसल्यामुळे औषधांची फवारणी करूनही त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. पाऊस न झाल्याने पीक पूर्णपणे हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. कापसाची बोंडे आणि फुले गळत असून आता उत्पादन मिळण्याची आशाही कमी झाली आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात केवळ कापूसच नव्हे तर तूर, भात आणि इतर पिकांवरही पावसाच्या कमतरतेचा परिणाम झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त म्हणून विचार करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी जोर धरत आहे. पंचनाम्याच्या अटी न घालता सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून कापूस, तूर, भात यासह सर्व पिकांच्या नुकसानीचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता केवळ पीक वाचवण्याचेच नव्हे, तर कर्जाचा बोजा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
