Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GONDIA : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई

Desk | Gondia

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची निर्दयपणे आणि अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. कोलारगाव ते कोहमारा मार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईत १० जनावरांची सुटका करण्यात आली असून, बोलेरो पिकअप वाहनासह तब्बल ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील चालक आणि त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत शेताच्या दिशेने पसार झाले. ही कारवाई ६ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता कोहमारा परिसरात करण्यात आली. पोलिस नायक रामटेके हे रात्रीच्या पाळीत डायल ११२ संदर्भातील कामकाजावर असताना त्यांना कोलारगाव ते कोहमारा मार्गावर कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता संबंधित मार्गावर नाकाबंदी केली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास कोलारगावकडून नवेशावबांध मार्गे कोहमाराकडे जाणारे एमएच ४० सीटी ४९४७ क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने काही अंतर पुढे जाऊन वाहन थांबविले. मात्र, वाहन थांबताच त्यातील दोन व्यक्तींनी खाली उतरून अंधाराचा फायदा घेत जवळच्या शेताच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ३ बैल, ३

गायी आणि ४ गोरे, अशी एकूण १० जनावरे आढळून आली. विशेष म्हणजे, या जनावरांना वाहनामध्ये अत्यंत निर्दयपणे कोंबण्यात आले होते. त्यांना पुरेशी जागा, चारा-पाणी तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून न देता वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन आणि अंदाजे १ लाख रुपये किमतीची १० जनावरे, असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना पुढील कार्यवाहीसाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.  या प्रकरणी पोलिस शिपाई उद्देभान रुखमोडे यांच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांवर क्रूरतेने वागणूक केल्याप्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, वाहनातील दोन्ही संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या अवैध जनावर वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच जनावरांची नेमकी कुठे आणि कोणाकडे वाहतूक केली जात होती, याचाही तपास केला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातून जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.