Desk : akola
लग्न जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; महिलेशी लग्न केल्यानंतर दोन महिन्यांत भांडाफोड अकोला : लग्न जुळत नसल्याने एका तरुणाने चक्क आपण नायब तहसीलदार असल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर महसूल विभागात निवड झाल्याचे खोटे सांगत या तरुणाने एका महिलेशी विवाहही केला. मात्र लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्याच्या बनावाचा पर्दाफाश झाला. पत्नीने पतीच्या ओळखपत्राची अधिकृत कार्यालयात चौकशी केल्यानंतर तो नायब तहसीलदार नसल्याचे समोर आले. संदीप उर्फ सुवर्णदीप पुरुषोत्तम वानखेडे असे या प्रकरणातील आरोपी तरुणाचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुरडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीपचे लग्न जुळत नसल्याने त्याने स्वतःची बनावट ओळख तयार केली. आपण महसूल विभागात निवड झालेला अधिकारी असून नायब तहसीलदार पदावर कार्यरत असल्याचा खोटा दावा त्याने केला. त्यासाठी त्याने नायब तहसीलदार असल्याचे दर्शविणारे ओळखपत्र तयार केले होते. एवढ्यावरच न थांबता त्याने विवाहासाठी WhatsApp ग्रुपमध्ये आपला बायोडेटाही शेअर केला. या बायोडेटामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख नायब तहसीलदार असा केला होता. या बनावट ओळखीच्या आधारे अकोला शहरातील तापडिया नगर परिसरातील एका महिलेशी त्याचा विवाह झाला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे दिसत होते. मात्र लग्नानंतर संदीपच्या वागण्यातून पत्नीला हळूहळू संशय येऊ लागला. तो दररोज केवळ दोन तास कामासाठी घराबाहेर पडत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे त्याच्या नोकरीबाबत पत्नीला शंका निर्माण झाली. अखेर पत्नीने संदीपकडे असलेल्या नायब तहसीलदार पदाच्या ओळखपत्राची खातरजमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने अकोला तहसील कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी संदीप नावाचा कोणताही व्यक्ती नायब तहसीलदार म्हणून कार्यरत नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपल्याशी लग्न करताना पतीने खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 587/2026 दाखल करण्यात आला. पोलिसांनी संदीप वानखेडेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता.
दरम्यान, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुरडा येथून संदीप उर्फ सुवर्णदीप पुरुषोत्तम वानखेडे याला अटक केली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत. लग्न जुळवण्यासाठी एका तरुणाने थेट सरकारी अधिकाऱ्याची बनावट ओळख धारण करून महिलेशी विवाह केल्याचा हा प्रकार सध्या अकोला शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
