Desk | Amravati
भारतीय खाद्य निगम अर्थात एफसीआयमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बहिण-भावाकडून तब्बल ६२ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत समोर आला आहे. आरोपींनी बनावट जॉइनिंग लेटर तयार करून ई-मेलद्वारे पाठवले आणि पीडितांचा विश्वास संपादन केला. मात्र प्रत्यक्ष नोकरीचा प्रश्न निर्माण होताच संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आप्पा गोडाम याची ओळख खासदारांचा पीए असल्याचे सांगून करून देण्यात आली होती. त्यामुळे पीडितांचा त्याच्यावर मोठा विश्वास बसला. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपींनी दिल्लीतील एफसीआयमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी शुभांगी यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये आरोपी मनोज याने एका नातेवाईकाला पोस्टात नोकरी लागल्याचे सांगत बनावट लेटर दाखवले. त्यानंतर फिर्यादीसह तिच्या भावालाही शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. पुढे मनोजने मुख्य सूत्रधार जितेंद्र ऊर्फ आप्पा प्रभाकर गोडाम याची ओळख करून दिली. गोडाम हा एफसीआयमध्ये पीए असल्याचे सांगण्यात आल्याने पीडितांचा विश्वास आणखी दृढ झाला. यानंतर आरोपींनी दिल्लीतील एफसीआयमध्ये एजी-३ पदासाठी तब्बल ३० लाख रुपयांची मागणी केली. आरोपींच्या बड्या लोकांशी ओळखी असल्याचे सांगितल्याने फिर्यादी आणि तिच्या भावाने वेळोवेळी मोठी रक्कम दिली. मात्र पैसे घेतल्यानंतर नोकरीबाबत ठोस माहिती देण्यात आली नाही. अखेर संशय निर्माण झाल्यानंतर
चौकशी केली असता जॉइनिंग लेटर आणि नोकरीसंदर्भातील कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक लक्षात आल्यानंतर पीडितांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे अखेर शुभांगी यांनी पोलिसांत धाव घेतली. तपासादरम्यान आरोपींनी आणखी एका व्यक्तीलाही अशाच प्रकारे फसवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपींनी एफसीआयच्या नावाचा गैरवापर करून बनावट ऑर्डर तयार केली, तर दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून दिल्याचेही सांगण्यात आले. तसेच पंजाबमधील गुरदासपूर येथे नोकरी लागल्याचा बनावट ई-मेलही पाठवण्यात आला. अधिकाऱ्यांनी ई-मेल बनावट असल्याचे स्पष्ट केल्यानंतर फसवणुकीचे स्वरूप उघड झाले. राजापेठ पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ आप्पा गोडाम, मनोज आळगे, एक महिला, नामदेव कडू, अपूर्व कडू आणि शिवम सेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींनी आणखी किती जणांना अशाच प्रकारे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवले आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडून लाखो रुपये गमावणाऱ्या या प्रकरणामुळे बनावट नियुक्तीपत्रे आणि दलालांच्या जाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा पुन्हा एकदा समोर आला आहे. सरकारी नोकरीसाठी कोणत्याही व्यक्तीला मोठी रक्कम देण्यापूर्वी संबंधित विभागाकडून कागदपत्रांची अधिकृत पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
