Desk | Dili
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांच्या आंदोलनाला आज पुन्हा एकदा वेग आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक खासदार राजघाटकडे रवाना झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. स्नेहभोजनानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. राजघाट येथील गांधी स्मारकाजवळ धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या माध्यमातून सरकारविरोधात आपला निषेध नोंदवला जाणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी सरकारवर गंभीर आरोप केले. देशातील नागरिकांचा मताधिकार हिरावला जात असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांकडून शांततापूर्ण आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, सरकारकडून आंदोलनाला परवानगी दिली जात नसल्याचा आणि
आंदोलकांना अडवून ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काल जंतरमंतरच्या दिशेने जात असताना आपल्याला वाटेतच रोखण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आज राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार तीन बसमधून राजघाटकडे रवाना झाले. पहिल्या बसमध्ये प्रमुख नेते, तर इतर बसमध्ये विरोधी पक्षांचे खासदार असल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील काही खासदारांचाही या आंदोलनात सहभाग आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, घोषणाबाजी करत ते नेत्यांच्या ताफ्यासोबत पुढे जात आहेत. आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, काल जंतरमंतरच्या दिशेने जाणाऱ्या विरोधकांना पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे आज राजघाटपर्यंत खासदारांना जाण्याची परवानगी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, ठिकठिकाणी बॅरिकेडिंग आणि सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत असून, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आजचे हे आंदोलन केवळ निषेधापुरते मर्यादित राहणार की, यामुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
