Top 5 This Week

Related Posts

BREAKING

wardha : लॉलीपॉप-चॉकलेट देऊन मतं घेण्याचा भाजपचा फंडा : वडेट्टीवार !

Desk | wardha

मुंबई : लॉलीपॉप आणि चॉकलेटचे आमिष दाखवून मतं मिळवण्याचा नवीन फंडा भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणुका झाल्यानंतर सत्ता मिळवून सरकार सामान्य आणि गरीब जनतेपासून दूर गेले असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकार हे जनतेला फसवणारे आणि जुमलेबाज असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी, भटक्या आणि विमुक्त समाजाच्या प्रश्नांवरही वडेट्टीवार यांनी सरकारकडे महत्त्वाची मागणी केली. मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ज्या पद्धतीने शिंदे समिती स्थापन करण्यात आली, त्याच धर्तीवर ओबीसी तसेच भटक्या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या समितीच्या माध्यमातून संबंधित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारण्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारला सवाल MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. परीक्षांमध्ये पेपरफुटी, निकालातील गोंधळ, नियुक्त्यांना होणारा विलंब आणि विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक विद्यार्थी पाच-सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. पुण्यात अत्यंत कठीण परिस्थितीत राहून विद्यार्थी अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले. MPSC कडे राज्यातील मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांची भरती करण्याची जबाबदारी असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. MPSC अध्यक्षांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास राहिलेला नसल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी MPSC अध्यक्षांबाबत पुनर्विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाला राहुल गांधी लवकरच भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी राज्यातील शेतकरी संकटावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून पूर्णपणे मुक्त करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राज्यावर वाढलेल्या कर्जाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना मोठ्या प्रकल्पांवर होणाऱ्या खर्चावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारने धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे वडेट्टीवार म्हणाले. यासोबतच केंद्र सरकारच्या कारभारावरही त्यांनी जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याचा आरोप त्यांनी केला. बँकिंग व्यवस्था, उद्योगपतींचे कर्ज आणि देशातील गुंतवणुकीच्या वातावरणावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. सरकारने सामान्य नागरिक, विद्यार्थी, ओबीसी समाज आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.