Desk | nagpur
पुण्यानंतर नागपुरातही ‘डी जेबंदी’साठी जनचळवळ; संदीप जोशींचा पुढाकार नागपूर : पुण्यानंतर आता नागपुरातही डीजेच्या वाढत्या आवाजाविरोधात जनचळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीजेच्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता माजी आमदार संदीप जोशी यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी डिजिटल ऑनलाइन पिटिशन तयार करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या जनचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. संदीप जोशी यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपताना उत्सव साजरे करण्यास कोणाचाही विरोध नाही. अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्ये, पथक तसेच संदल यांचा वापर केला जातो. मात्र, त्यांचा आवाज तुलनेने कमी असल्याने त्याचा सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रासही कमी असतो. त्यामुळे उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषणाचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेची सुरुवात स्वतःपासून करण्याचा निर्णय संदीप जोशी यांनी घेतला आहे. त्यांच्या संपर्कातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून यंदा डीजेचा वापर केला जाणार नाही, असे हमीपत्र घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. स्वतःच्या गणेशोत्सव मंडळांपासून डीजेबंदीची सुरुवात करत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने ध्वनीप्रदूषण आणि आवाजाच्या मर्यादेबाबत दिलेल्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. परवानगी देताना संबंधित आयोजकांकडून हमीपत्र घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाचे आदेश असताना त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, तर ते योग्य ठरणार नाही, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर येत्या दोन-तीन दिवसांत डिजिटल पिटिशन सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन डीजेच्या आवाजाबाबत तसेच न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली जाणार आहे. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही,
तर गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासोबतच मुख्यमंत्री यांच्याशीही या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. डीजे वाजवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही आपले लोक आहेत, हे मान्य करत त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा विचार करण्याची गरज व्यक्त केली. उत्सव आणि परंपरा जपत असतानाच ध्वनीप्रदूषणामुळे इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे नागपुरातील डीजेबंदीची ही प्रस्तावित जनचळवळ कितपत व्यापक स्वरूप घेते आणि प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
