Desk : nagpur
नागपूरच्या कामठी मार्गावर खड्ड्याने घेतला महिलेचा जीव; ई-बाईक उसळली, बसखाली चिरडून 28 वर्षीय अंजलीचा मृत्यू नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका 28 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर-कामठी मार्गावर सोयना पब्लिक स्कूलसमोर हा भीषण अपघात झाला. रस्त्यातील खड्ड्यातून दुचाकी उसळल्यानंतर महिलेचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर कोसळली. याचवेळी मागून आलेल्या महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव अंजली रविशंकर पांडे असून ती 28 वर्षांची होती. अंजली ही वैष्णव देवी नगर परिसरातील रहिवासी होती. ती जरीपटका परिसरातील एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अंजली ई-बाईकवरून कामावर जात होती. त्यावेळी कामठी मार्गावर सोयना पब्लिक स्कूलसमोर तिच्या दुचाकीसमोर रस्त्यातील मोठा खड्डा आला. दुचाकी खड्ड्यातून गेल्यानंतर अचानक उसळली. त्यामुळे अंजलीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली दुचाकी थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या जोरदार धडकेनंतर अंजली रस्त्यावर खाली कोसळली. त्याचवेळी मागून येत असलेल्या नागपूर महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसखाली ती आली. बसच्या चाकाखाली चिरडल्याने अंजलीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला. अपघाताची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर रस्त्याच्या स्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी सध्या रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याची एक बाजू बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गावरून सुरू आहे. त्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्डे आणि सुरू असलेले बांधकाम यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतच आहे, पण वाहनचालकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अंजली पांडे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. एका खड्ड्यामुळे एका कुटुंबातील तरुणीचा जीव गेल्याने या घटनेने नागपूर शहरातील रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन या रस्त्यावरील खड्डे आणि सुरू असलेल्या कामाबाबत काय उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
