Desk | nagpur
नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप; तीन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी नागपूरच्या मातोश्री नगर परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जुगाराच्या कारवाईच्या नावाखाली मारहाण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत संबंधित तीन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या तिन्ही कर्मचाऱ्यांना डिटेक्शन ब्रांचमधून हटवून सामान्य पोलीस बंदोबस्ताच्या कामावर नियुक्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबर रोजी मातोश्री नगर परिसरात जुगार खेळला जात असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. याच कारवाईदरम्यान संबंधित गणेश मंडळातील काही कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप पीडित तरुणांकडून करण्यात आला. पोलिसांनी मारहाण केली तसेच कारवाईच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या आरोपांबाबत अद्याप अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, चौकशीनंतरच पुढील कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन पोलिसांची बाजू स्पष्ट केली. गोकुळ महाजन यांनी सांगितले की, 8 सप्टेंबर रोजी परिसरात नाकाबंदी आणि इतर बंदोबस्ताची कारवाई सुरू होती. त्याचदरम्यान महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांबाबत आक्षेप घेतला आहे. या आक्षेपांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान काही त्रुटी आढळल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले. या त्रुटींसंदर्भातील चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. आता वरिष्ठ स्तरावर या अहवालाची पाहणी करून चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या या तिन्ही कर्मचाऱ्यांना डिटेक्शन ब्रांचमधून काढून जनरल ड्युटी देण्यात आली आहे.
मात्र, नेमकी कोणती नियमभंगाची बाब आढळली, असा सवाल करण्यात आल्यानंतर महाजन यांनी स्पष्ट केले की, आरोपितांनी केलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे. चौकशीचा अंतिम अहवाल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जाणारा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
