Desk | amravati
अमरावतीत चारचाकी वाहनात शस्त्र दाखवत दहशत पसरवणारा व्हिडिओ व्हायरल; चार आरोपी अटकेत, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त अमरावती : सोशल मीडियावर चारचाकी वाहनात बसून हातात प्राणघातक शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चारचाकी वाहन आणि लोखंडी चॉपर असा एकूण 10 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक गस्त घालत असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आला. या व्हिडिओमध्ये काही तरुण चारचाकी वाहनात बसलेले दिसत असून त्यांच्या हातात घातक शस्त्रे होती. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओतून दिसून आले. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान संबंधित चारचाकी वाहनाबाबतही माहिती समोर आली. पोलिसांच्या तपासात आरोपींनी हे वाहन राहुल टाले, रा. पदम सौरभ कॉलनी, अमरावती यांच्या परवानगीशिवाय घेऊन गेल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आदित्य लढे (वय 21), रा. पुष्पक कॉलनी, अमरावती; आदित्य कडू (वय 31), रा. पोस्टमन कॉलनी, साईनगर, अमरावती; सम्यक ढोके (वय 21), रा. फॉरेस्ट कॉलनी, अमरावती आणि भावेश गुंडाणे (वय 21), रा. शिवाजी संकुलजवळ, रविनगर, अमरावती या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 10 लाख रुपये किमतीची चारचाकी कार आणि 3 हजार 900 रुपये किमतीचा लोखंडी चॉपर जप्त केला आहे. त्यामुळे या कारवाईत एकूण 10 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. दरम्यान, चौकशीमध्ये आरोपींपैकी एकाने घटनेबाबत माहिती देताना ते तिघे एका ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर अजिंक्य नावाच्या व्यक्तीच्या काकांची कार घेऊन लोणी परिसरात दारू पिण्यासाठी गेल्याचे सांगितले. परत येताना एका वाहनाने कट मारल्यानंतर चाकू काढून दहशत निर्माण केल्याचे त्याने कबूल केले. तसेच या प्रकाराबद्दल माफी मागत पुन्हा अशी चूक होणार नसल्याचेही त्याने म्हटले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक उमेश मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे आणि पोलीस पथकाने केली आहे. सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारांवर पोलिसांची करडी नजर असून, अशा कृत्यांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
