Desk | Bhandara
पिलांद्री गावात मागील दीड वर्षापासून वाढलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण बिघडल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावातील अवैध दारू विक्रेत्यांचे पाणी आणि वीज कनेक्शन खंडित करण्याचा ठराव ग्रामसभा व तंटामुक्ती समितीने घेतला आहे. गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा तरुण आणि पुरुषांच्या व्यसनाधीनतेवर तसेच महिलांवर व कुटुंबांवर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी दारूबंदी करूनही काही ठिकाणी पुन्हा खुलेआम दारू विक्री सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
गावातील दुकानांमध्येही दारू विकली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सोमवारी तंटामुक्ती समितीने अचानक धाड टाकल्यावर काही विक्रेत्यांनी बाटली फेकून पळ काढल्याचेही समितीच्या सदस्यांनी सांगितले. “पोलिस प्रशासनाने सुद्धा ग्रामस्थांना सहकार्य करणे गरजेचे आहे,” अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. गावातील नैतिक व सामाजिक वातावरण टिकवण्यासाठी पोलिसांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून गावातील दारूबंदीचा निर्णय कितपत प्रभावी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
