Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : वाढदिवस साजरा करण्यासाठी चोरीचा कट; तिघांना अटक !

Desk | nagpur

वाढदिवसाच्या पार्टीसाठी चोरीचा कट; नागपुरात टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक नागपूर : वाढदिवसाची पार्टी धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी पैशांची गरज भासल्याने चोरीचा मार्ग स्वीकारणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सिगारेटची पाकिटे लंपास करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रोख रक्कमही जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलाचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी मिळून एका फार्महाऊसवर पार्टीचे आयोजन केले होते. मात्र पार्टीसाठी पैसे कमी पडल्याने या टोळीने चोरी करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी नागपूर शहरातील दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. 30 ऑगस्टच्या रात्री पहिली चोरी 30 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आरोपींनी नंदनवन सिमेंट रोड परिसरातील ‘सिग्नेचर चाय सुट्टा कॅफे’ला लक्ष्य केले. कॅफेमध्ये प्रवेश करून आरोपींनी अंदाजे दोन हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 20 हजार रुपये किमतीची सिगारेटची पाकिटे चोरी केल्याची माहिती आहे. यानंतर याच टोळीने सक्करदरा परिसरातील बीमा हॉस्पिटल चौकाजवळील ‘मिकी पान सेंटर’वरही चोरी केली. या दुकानातूनही रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटे लंपास करण्यात आली. दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिसणारे आरोपी आणि चोरीची पद्धत यामध्ये साम्य आढळून आल्याने दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने आरोपींचा शोध सुरू केला. चोरलेला माल विकून पैशांची वाटणी तपासादरम्यान आरोपी चोरी केलेला सिगारेटचा माल वनदेवी चौक परिसरातील एका पान स्टॉलवर विकून त्यातून मिळालेल्या पैशांची वाटणी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. ईट भट्टी चौकाजवळ पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पियुष उर्फ डीजे निलेश सोमटक्के (वय 18), मोहम्मद फयाज अंसारी (वय 19) आणि वृत्तांत उर्फ चॉकलेट दीपक द्रविडकर (वय 21) अशी असून, तिघेही यशोधरानगर परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चौकशीदरम्यान आरोपींनी दोन्ही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील सुमारे तीन हजार रुपये रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींची यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असून, ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. वाढदिवसाची पार्टी अविस्मरणीय करण्यासाठी चोरीचा मार्ग निवडलेल्या या टोळीची पार्टी सुरू होण्यापूर्वीच गुन्हे शाखेने त्यांचा डाव उधळून लावला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत