Desk | thane
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आज पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपकडून ‘लोकशाही वाचवा’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, दुसरीकडे ठाण्यात विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर मुंबई आणि ठाण्यात आज राजकीय शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज ‘लोकशाही वाचवा’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान येथून सुरुवात होणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे या पदयात्रेत सहभागी होणार असून, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकशाहीच्या संरक्षणाचा संदेश देण्यासाठी भाजपकडून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्यात मात्र वेगळ्याच कारणावरून राजकीय वातावरण तापले आहे. पुणेकर यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या तरुणांना झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नेमकी काय कारवाई करण्यात आली, संबंधितांवर कोणती पावले उचलण्यात आली आणि पोलिसांची भूमिका काय होती, याचा जाब विचारण्यासाठी विरोधकांनी आंदोलनाची तयारी केली आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात मनसेचे नेते अविनाश जाधव, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, विक्रांत चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तरुणांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि आतापर्यंत झालेल्या कारवाईचा तपशील जाहीर करावा, अशीही भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
एकीकडे मुंबईत भाजपची लोकशाही वाचवा पदयात्रा, तर दुसरीकडे ठाण्यात विरोधकांचा पोलीस ठाण्यावर घेराव, अशा दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे आज मुंबई आणि ठाण्यातील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही आंदोलनांना किती प्रतिसाद मिळतो आणि प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
