Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BHANDARA : प्रवेशासाठी देणगी मागितली तर शाळेवर होणार कारवाई !

Desk | bhandara

भंडारा : खासगी विनाअनुदानित शाळांमधील पूर्व प्राथमिक प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क आकारणीतील मनमानी रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळांकडून प्रवेशाच्या वेळी पालकांची मुलाखत घेणे, विद्यार्थ्यांची चाचणी घेणे, कॅपिटेशन फी आकारणे तसेच अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणे अशा प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासोबतच पालकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी पालकांची इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढती पसंती दिसून येत आहे. मात्र, या संधीचा फायदा घेत काही शाळांकडून प्रवेश प्रक्रियेदरम्यान मनमानी केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रवेशासाठी पालकांच्या मुलाखती घेणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्याच्या नावाखाली चाचण्या घेणे, तसेच उत्पन्नाचे दाखले, कुटुंबाचे छायाचित्र आणि इतर अनावश्यक कागदपत्रे मागवली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. गल्लोगल्लीतील प्री-स्कूल आणि प्ले-स्कूलवरही लक्ष शहरांसह ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण वाढले आहे. अनेक पालक आपल्या मुलांना लहान वयातच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असतात. याच संधीचा फायदा घेत काही ठिकाणी प्री-स्कूल आणि प्ले-स्कूलच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेत मनमानी केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा शाळांच्या प्रवेश प्रक्रियेवरही नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रवेशासाठी चाचणी घेण्यास मनाई प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांची मुलाखत घेता येणार नाही. तसेच प्रवेशासाठी लेखी, तोंडी चाचणी अथवा स्क्रीनिंग प्रक्रिया राबविण्यासही मनाई करण्यात आली आहे. शाळांनी निर्धारित केलेल्या आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करू नये. पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुलाखती, कुटुंबाचे छायाचित्र यांसारख्या अनावश्यक बाबींचा समावेश करून पालकांवर दबाव आणता येणार नाही. कशाच्याही आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची देणगी, कॅपिटेशन फी किंवा इतर अनधिकृत शुल्क आकारता येणार नाही. विद्यार्थ्याचे जात, धर्म, भाषा, लिंग, सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती अथवा पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी आणि प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, हा या निर्देशांचा मुख्य उद्देश आहे.

नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईचे निर्देश मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १३ नुसार प्रवेशासाठी कॅपिटेशन फी आकारणे तसेच बालक किंवा पालकांची स्क्रीनिंग प्रक्रिया राबविणे प्रतिबंधित आहे. या तरतुदींचे उल्लंघन झाल्यास संबंधित शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेवर आणि शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रवेशाच्या नावाखाली पालकांची आर्थिक पिळवणूक किंवा विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये, यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आता या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते आणि मनमानी करणाऱ्या शाळांवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.