Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GADCHIROLI : गडचिरोली जिल्ह्यात १५ टक्के खातेदारांची पीक पाहणी अपूर्ण

Desk | gadchiroli

गडचिरोली : खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ४० हजार १३८ खातेदार अद्याप पीक पाहणी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर आता पीक नोंदणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ साठी ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया ११ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नेटवर्कची समस्या, मोबाईल अॅप वापरण्यात येणाऱ्या अडचणी, तांत्रिक अडथळे तसेच जिल्ह्यातील दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही.प्राप्त आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ५९ हजार ४८० खातेदार आहेत. त्यापैकी २ लाख १९ हजार ३४२ खातेदारांची पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित ४० हजार १३८ खातेदारांची पीक पाहणी अद्याप अपूर्ण आहे. म्हणजेच जिल्ह्यातील सुमारे १५ टक्के खातेदारांची पीक नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये नेटवर्कची समस्या असल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल अॅपसोबत सहाय्यकांमार्फतही नोंदणी ई-पीक पाहणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना स्वतः पीक नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना मोबाईल अॅप वापरणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी सहाय्यकांमार्फत नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या प्रक्रियेत मदत केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी नेटवर्कची अनुपलब्धता, मोबाईलमधील तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेबाबत अपुरी माहिती यामुळे नोंदणीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. पीक नोंदणी नसेल तर शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता ई-पीक पाहणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक नोंद असणे आवश्यक असते. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळवताना पीक नोंदणी महत्त्वाची ठरते. त्यामुळे वेळेत पीक पाहणी न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ३० नोव्हेंबर ही अंतिम संधी! ई-पीक पाहणीसाठी सुरुवातीला १० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती.

मात्र, अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अपूर्ण असल्याने ही मुदत वाढवून ३० नोव्हेंबर २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे आणि त्यांना नोंदणीसाठी आवश्यक सहकार्य करणे गरजेचे आहे. उर्वरित ४० हजार १३८ खातेदारांची पीक पाहणी निर्धारित मुदतीत पूर्ण होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.