Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपुरात प्रशासनाची जय्यत तयारी

Desk | Nagpur

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या निवासाचा प्रश्न यंदा मोठ्या प्रमाणात सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनुयायांना उन्ह, पाऊस आणि हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी दीक्षाभूमी परिसरात २१ निवारा कक्ष अर्थात डोम उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक डोममध्ये किमान एक हजार अनुयायांची राहण्याची व्यवस्था केली जाणार असून, त्यामुळे सुमारे २१ हजार अनुयायांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय देश-विदेशातून येणाऱ्या सुमारे पाच हजार भिक्षूंच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होतात. विविध राज्यांमधून तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या अनुयायांसाठी निवासाची पुरेशी व्यवस्था करणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. यंदा या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन करण्यात आले असून, उधड्यावर होणाऱ्या निवासाला आता छत मिळणार आहे. यंदा २९ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार असून, त्यासाठी दोन दिवस आधीपासूनच अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होण्यास सुरुवात होते. दरवर्षी लाखो अनुयायी येत असल्याने त्यांच्या मुक्कामासाठी सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे. डोम उभारणीसाठी सामाजिक कल्याण विभागाच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे. या निवारा कक्षांमध्ये भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी संबंधित नावे देण्याचेही नियोजन आहे. अनुयायांच्या सुविधेसोबतच भिक्षूंच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार भिक्षूंसाठी आवश्यक निवासाची सोय केली जाणार असून, त्यांना सन्मानपूर्वक आणि सुरक्षित मुक्काम करता यावा, हा व्यवस्थेचा प्रमुख उद्देश आहे. दीक्षाभूमीच्या आतील परिसरात पाच निवारा कक्षांसह विविध ठिकाणीही निवास व्यवस्था उभारली जाणार आहे. यामध्ये जागोजागी निवारा कक्ष, कुंभार शाळा परिसरातील सुविधा, चार निवारा कक्ष आणि यासह इतर ठिकाणीही तात्पुरती व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा हिवताप कार्यालय, इंटरनॅशनल बुद्धिस्ट ठिकाणे आणि इतर परिसरातही नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, निवास

व्यवस्थेसोबतच आरोग्य आणि स्वच्छतेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. परिसरात तक्रार निवारण केंद्र, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, बालकांसाठी खेळण्याची जागा, तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने औषधशाळा, वैद्यकीय कक्ष, मोबाइल हॉस्पिटल आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी नियमित साफसफाई, जंतुनाशक फवारणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था आणि मोबाईल शौचालयांची सुविधा केली जाणार आहे. मोठ्या संख्येने अनुयायी एकाच ठिकाणी येणार असल्याने आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना यंदा अधिक सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सोयीस्कर वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर तयारी सुरू आहे. लाखो अनुयायांच्या गर्दीचे नियोजन, निवास, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा समन्वय साधत धम्मचक्र प्रवर्तन दिन सुरळीत पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे यंदाची २१ डोमची निवासव्यवस्था अनुयायांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.