Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AMRAVATI : अमरावतीत कचऱ्याचे ढीग! सफाई कामगारांचा संप कायम

Desk | Amravati

महानगरपालिका हद्दीतील अमरावती आणि बडनेरा शहरात गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून, नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. सफाई कर्मचाऱ्यांचा संप नवव्या दिवशीही कायम असल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्वपदावर कधी येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरातील दैनंदिन कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम कंत्राटी कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांमुळे कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये नियमित कचरा उचलला जात नसल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कचऱ्यामध्ये प्लास्टिक, घरगुती कचरा तसेच इतर टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. काही ठिकाणी या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे, कचऱ्याच्या ढिगांमध्ये मोकाट जनावरेही फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात कचरा आणि साचलेले पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनावर प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये आणि नागरिकांना वेठीस धरले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

शहरातील स्वच्छतेचे काम पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दुसरीकडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गावंडे यांनी शहरातील कचरा संकलनाचे काम सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. कचरा संकलनासाठी अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळाचा वापर करण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, बडनेरा शहरात काही प्रमाणात कचरा संकलनाचे काम सुरू झाले असले तरी अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग कायम आहेत. त्यामुळे “आजपासून शहरातील स्वच्छतेची कामे ‘ओके’ होणार का?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता सफाई कामगारांच्या मागण्यांवर प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये तोडगा कधी निघतो आणि शहरातील कचरा समस्या किती लवकर दूर होते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.