Desk | Bhandara
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी विविध स्तरांवर पडताळणी केली जात असतानाच भंडारा जिल्ह्यात मतदार यादीतील नोंदींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. एका घर क्रमांकावर तब्बल १० मतदारांची नावे असल्याचा प्रकार समोर आल्याने मतदार यादीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी एकाच घर क्रमांकावर वेगवेगळ्या कुटुंबातील मतदारांची नोंद असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाच्या पडताळणी प्रक्रियेवरही चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांमधील दुबार नावे, चुकीचे पत्ते, स्थलांतरित मतदार तसेच मृत मतदारांच्या नोंदी तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष पडताळणीच्या प्रक्रियेतच त्रुटी राहिल्यास अंतिम मतदार यादी कितपत अचूक राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, काही मतदारांच्या पत्त्यांमध्येही संभ्रम निर्माण करणाऱ्या नोंदी आढळल्या आहेत. एका घराचा क्रमांक ५०, ७० किंवा ९० असा असताना त्याच क्रमांकावर अनेक मतदारांची नावे दाखवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर एकाच घर क्रमांकावर दहा मतदारांची नोंद असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे मतदार यादीच्या प्रशासकीय स्तरावर
फेरपडताळणी करण्याची मागणी पुढे आली आहे. मतदारांची नावे योग्य व्यक्ती, योग्य पत्ता आणि योग्य मतदान केंद्राशी जोडलेली आहेत का, याची प्रत्यक्ष तपासणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील या प्रकारामुळे बीएलओंकडून होणारी पडताळणी प्रत्यक्ष घरभेटीद्वारे झाली की केवळ कागदोपत्रीच प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कारण जर प्रत्यक्ष पडताळणी काटेकोरपणे झाली असेल, तर एकाच घर क्रमांकावर अनेक मतदारांची नोंद कशी झाली, याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून अपेक्षित आहे. दरम्यान, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चरण वाघमारे यांनी मतदार याद्यांच्या फेरपडताळणीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराची नोंद अचूक आहे का, मतदाराचा पत्ता योग्य आहे का आणि एका पत्त्यावर असामान्य संख्येने मतदार दाखवले गेले असल्यास त्याची प्रत्यक्ष चौकशी झाली आहे का, याची तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा आधार असतो. त्यामुळे नाव, पत्ता, घर क्रमांक आणि मतदान केंद्राशी संबंधित प्रत्येक नोंद अचूक असणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात मतदानाच्या वेळी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता या प्रकरणाची प्रशासनाकडून कशी दखल घेतली जाते, संबंधित मतदार याद्यांची पुन्हा तपासणी होते का आणि चुकीच्या नोंदी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या जातात का, याकडे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
