Top 5 This Week

Related Posts

BREAKING

WARDHA : बस बायपासने पुढे जाते, विद्यार्थी शाळेत उशिराकेळझरमध्ये संताप

Desk | Wardha

शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने केळझर परिसरातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेच्या वेळेत एसटी बस गावात न येता बायपास मार्गाने पुढे जात असल्याने विद्यार्थ्यांना बसची वाट पाहत तासन्‌तास थांबावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर प्रश्नाकडे एसटी प्रशासन लक्ष देणार तरी कधी, असा सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. केळझर येथे सकाळच्या सत्रात शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांच्या सोयीच्या वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना बसस्थानकावर प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा बस गावात न येता बायपासवरून निघून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत किंवा महाविद्यालयात पोहोचता येत नाही. केळझरसह परिसरातील पाच ते सहा गावांमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज ये-जा करतात. त्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधन एसटी बस आहे. विद्यार्थ्यांकडे एसटीचे पास असतानाही वेळेवर बससेवा मिळत नसल्याने या पासचा उपयोग काय, असा प्रश्न पालक विचारत आहेत. विशेष म्हणजे, बसची प्रतीक्षा करताना विद्यार्थ्यांना बराच वेळ रस्त्यावर उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, काही विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात उशिरा पोहोचण्याची वेळ येत आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांकडून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप

परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही. गावकऱ्यांनी एसटी प्रशासनाला बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन केळझर गावात बस थांबविण्याच्या सूचना संबंधित चालक व वाहकांना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने केवळ निवेदन स्वीकारून न थांबता प्रत्यक्ष उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना पालक आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा मिळणार कधी आणि त्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?, हा प्रश्न सध्या केळझर परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.