Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NASHIK : कांदा एक्सप्रेसविरोधात आवाज उठवला; शेतकऱ्यावर गुन्हा!

Desk | nashik

कांदा एक्सप्रेसविरोधातील आंदोलन शेतकऱ्याला भोवले; गणेश निंबाळकर यांच्यावर रेल्वे पोलिसांचा गुन्हा लासलगाव : केंद्र सरकारच्या वतीने खरेदी करण्यात आलेला कांदा लासलगाव रेल्वे स्थानकातून ‘कांदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून दिल्लीला पाठवण्याच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी गणेश निंबाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी निंबाळकर यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या चार कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून कांदा दिल्लीला पाठवण्याच्या निर्णयाला विरोध करत गणेश निंबाळकर यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावर आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान रेल्वे थांबवणे, रेल्वे परिसरात अनधिकृतपणे प्रवेश करणे, आरडाओरड करणे, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज गणेश निंबाळकर यांना लासलगाव रेल्वे स्थानकातील आरपीएफ चौकीमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकीमध्ये त्यांची तब्बल चार तास सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी आंदोलनाशी संबंधित विविध बाबींची माहिती पोलिसांनी घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून त्यासंदर्भातील अहवालही तयार करण्यात आला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी गणेश निंबाळकर यांना समन्स बजावले असून, येत्या 28 तारखेला मनमाड न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कांदा एक्सप्रेसच्या मुद्द्यावरून सुरू झालेला शेतकऱ्यांचा विरोध आता कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचला आहे. याबाबत बोलताना गणेश निंबाळकर यांनी सांगितले की, काल त्यांच्या घरी रेल्वेचे चार ते पाच पोलीस आले होते. त्यांनी आज लासलगाव येथील रेल्वे पोलीस चौकीमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार निंबाळकर आज रेल्वे पोलीस चौकीत हजर झाले. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून संपूर्ण घटनेबाबतचा अहवाल लिहून घेतला. त्यानंतर त्यांना या प्रकरणाबाबत समज देण्यात आली. तसेच चार ते पाच कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, 28 तारखेला मनमाड न्यायालयात हजर राहण्याचे समन्सही त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून कांदा दिल्लीला पाठवण्याच्या निर्णयाविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कांद्याच्या खरेदी-विक्रीसह वाहतुकीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये आधीच नाराजीचे वातावरण असताना, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गणेश निंबाळकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शेतकरी संघटना आणि स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.