Desk | Wardha
५६ लाख ७ हजारांची वीजचोरी उघड; ५२२ ग्राहकांवर कारवाई जिल्ह्यात वीजचोरीविरोधात महावितरणने धडक मोहीम राबवत वीजचोरांना मोठा दणका दिला आहे. या कारवाईत तब्बल ५६ लाख ७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून, ५२२ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महावितरणच्या पथकांकडून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक ग्राहकांकडून अनधिकृतपणे वीज वापर होत असल्याचे समोर आले. काही ठिकाणी थेट वीजवाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी करण्यात आल्याचे आढळले, तर काही प्रकरणांमध्ये मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापर कमी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, वीजचोरीसाठी वापरण्यात आलेल्या काही क्लृप्त्या पाहून महावितरणचे अधिकारीही चक्रावले. मीटरची गती कमी करणे, मीटरमध्ये तांत्रिक फेरफार करणे किंवा वीज
वापराची नोंद होऊ नये यासाठी विविध प्रकारे छेडछाड करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांवर महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. या कारवाईदरम्यान वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट विभागात वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. वीजचोरीमुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसतोच; मात्र त्याचा परिणाम नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवरही होतो. अनधिकृत वीज वापरामुळे वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त भार पडतो आणि त्यातून रोहित्रांवर ताण, तांत्रिक बिघाड तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. महावितरणकडून वीजचोरीविरोधातील तपासणी आणखी तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे सदोष मीटर, संशयास्पद वीजवापर आणि अनियमित बिलिंग असलेल्या ग्राहकांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. नियमबाह्य पद्धतीने वीज वापरणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
