Desk | Bhandara
भंडारा महिला रुग्णालयातील २८.५० कोटींच्या साहित्य खरेदीवरून खळबळ! भंडारा येथील महिला रुग्णालयासाठी करण्यात आलेल्या तब्बल २८ कोटी ५० लाख रुपयांच्या साहित्य खरेदीवरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. महिला रुग्णालयासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी निविदा काढण्यात आली होती. मात्र, ही निविदा रद्द करून पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर वैद्यकीय साहित्य पुरवठ्याचा पुरेसा अनुभव नसलेल्या कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत निविदा नेमकी कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आली आणि कंत्राट देताना कोणाचा दबाव होता? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच एवढ्या मोठ्या रकमेची निविदा मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना होता का,
याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीने भंडारा येथे येऊन साहित्याची तपासणी केली होती. मात्र, चौकशी अहवाल अद्याप समोर न आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा हा व्यवहार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी संबंधित असल्याने संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक होती का, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे. आता या आरोपांची शासनाकडून कधी चौकशी होते आणि चौकशीचा अहवाल कधी जाहीर केला जातो, याकडे भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
