Top 5 This Week

Related Posts

BREAKING

LATUR : पावसाने फिरवली पाठ; लातूरमध्ये टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान !

Desk | latur

लातूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने टोमॅटोची शेती संकटात सापडली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडत आहेत. परिणामी, कष्टाने उभी केलेली टोमॅटोची पिके उन्हाच्या तीव्रतेमुळे कोमेजून जात असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.चाकूर तालुक्यातील वडवळ, जानवळ आणि परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने आणि पाण्याचे स्रोत आटल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे टोमॅटोची झाडे वाळू लागली आहेत. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर खराब होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दीड एकर टोमॅटो शेतीवर संकट चाकूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांच्याकडे दीड एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड असून पाण्यासाठी सहा बोअरवेल आहेत. मात्र, एवढ्या बोअरवेल असूनही जमिनीमध्ये पाण्याचा पुरेसा स्रोत उपलब्ध नाही. बोअरवेलमधून अवघे 15 ते 20 मिनिटे पाणी मिळत असल्याने ते पिकांसाठी पुरेसे ठरत नाही. या टोमॅटोच्या पिकासाठी शेतकऱ्याने जवळपास तीन महिन्यांपासून मेहनत घेतली आहे. लागवड, औषधे, खते आणि इतर खर्च करून पीक उभे केले; मात्र पाण्याअभावी संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, टोमॅटोचे पीक एकदाही व्यवस्थित तोडता आले नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. व्हायरसचा प्रादुर्भाव आणि पावसाअभावी दुहेरी संकट यंदा टोमॅटो उत्पादकांना केवळ पाणीटंचाईचाच सामना करावा लागत नाही, तर पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानेही नुकसान सहन करावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी दोन वेळा टोमॅटोची लागवड करूनही अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यातच पावसाचा अभाव आणि वाढत्या तापमानामुळे पिकांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. टोमॅटोचे उत्पादन कमी होण्याबरोबरच बाजारात विक्रीयोग्य माल तयार करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्च वसूल होण्याची शक्यताही कमी झाली आहे. पिकाला पाणी नाही, उत्पादनाची खात्री नाही आणि बाजारात अपेक्षित भावही मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नाम फाउंडेशनकडून मदतीची अपेक्षा शेतकऱ्याने यावेळी नाम फाउंडेशनकडून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मागील वर्षी संस्थेकडून मदत मिळाल्याचे सांगत, यंदा पाऊस नसल्यामुळे बियाण्यांच्या मदतीपेक्षा पाण्याचा प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. वडवळ परिसरात पाण्याचे स्रोत आटत असल्याने केवळ टोमॅटोच नव्हे, तर इतर पिके आणि फळबागांनाही धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे परिसरातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पाणी साठवण आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. एकीकडे शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहेत, तर दुसरीकडे वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची कमतरता त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे. आता प्रशासन आणि संबंधित संस्थांकडून या संकटावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे चाकूर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.