Desk | dehli
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने दिल्लीत ‘लोकशाही वाचवा’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते आणि खासदार सहभागी झाले. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेडिंग करून अडवले. मोर्चादरम्यान विरोधकांनी निवडणूक आयोग आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा’, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच निवडणूक आयोग सरकारच्या हातातील कठपुतळी असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मोर्चाच्या ठिकाणी प्रियंका गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यात संवाद झाल्याचेही पाहायला मिळाले. राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान विरोधकांनी सरकारवर निवडणूक प्रक्रियेत कथित घपला होत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. आयोग आणि भाजपमध्ये संगनमत असल्याची शंका विरोधकांनी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरात असंतोष निर्माण झाला असून अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत. सरकार निवडणूक आयोगाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, सत्य समोर येईल आणि संबंधितांना जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा दावा विरोधकांनी केला. मोर्चादरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. निवडणूक आयोग सरकारच्या हातातील कठपुतळी असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. मोर्चाला आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ‘गली-गली में शोर है, मोदी-ज्ञानेश चोर है’, अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपकडून ज्ञानेश कुमार यांनी पक्षाला मदत केली नसल्याचे वक्तव्य करण्यात आल्याचा संदर्भ देत विरोधकांनी त्यावरही जोरदार टीका केली. ‘ज्ञानेश कुमार कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, ते संपूर्ण देशाचे आहेत’, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
