Desk | gondia
गोंदिया जिल्ह्यात दुष्काळाच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि रोष पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यातील केवळ तिरोडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केल्याने जिल्ह्यातील इतर सात तालुक्यांतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. त्यापैकी केवळ तिरोडा तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. मात्र, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस झालेला असला तरी अनेक भागांमध्ये पिकांवर रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. विशेषतः धान पिकावर मावा, तुडतुडा यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली. मात्र, पिकांचे नुकसान झाल्याने घेतलेले कर्ज फेडणेही कठीण झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गोरेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये धान पिकांची परिस्थिती गंभीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतात उभे असलेले धान पीक रोग-किडींमुळे खराब झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे केवळ पावसाचे प्रमाण लक्षात न घेता पिकांचे प्रत्यक्ष नुकसान, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यांचाही विचार करावा, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसाठे आणि तलाव असतानाही तो दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला आहे. मग इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही समान परिस्थितीचा सामना करावा लागत असताना त्यांना दुष्काळाच्या मदतीपासून वंचित का ठेवण्यात येत आहे, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दुष्काळग्रस्त तालुका घोषित झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध मदतीचा लाभ मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, शासनाने केवळ एका तालुक्याचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
रोग-किडींमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणि गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
