Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GADCHIROLI : नांगपूर गावात गांजाची शेती; १,७९० झाडे पोलिसांच्या ताब्यात

Desk | Gadchiroli

घराच्या मागील परसाबागेतच गांजाची बेकायदेशीर लागवड करून त्याची निगा राखली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोरची तालुक्यातील अतिदुर्गम नांगपूर गावात उघडकीस आला आहे. कोटगुल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल १ हजार ७९० गांजाची झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन तब्बल ८३ किलो ५०० ग्रॅम असून, त्याची अंदाजे किंमत २१ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नांगपूर येथील एका व्यक्तीने आपल्या घरामागील परसाबागेत गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोटगुल पोलीस ठाण्याचे अधिकारी विवेक बायकर यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे यांच्या पथकाने कोटगुल येथे धाव घेतली. यानंतर कोटगुल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. घराच्या मागील बाजूस असलेल्या परसाबागेची पाहणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे लागवड केलेली आढळून आली.

पोलिसांनी पंचनामा करून १,७९० झाडे ताब्यात घेतली. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन ८३ किलो ५०० ग्रॅम असल्याचे समोर आले. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या गांजाची लागवड नेमकी कशासाठी करण्यात आली होती, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या प्रकरणाचे कोणते धागेदोरे बाहेर येतात, याचा तपास सुरू आहे. घराच्या अंगणालगतच गांजाची शेती करून लाखोंचा माल तयार केला जात असल्याने या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध अमली पदार्थांच्या लागवडीला आळा घालण्यासाठी प्रशासन किती गंभीर आहे, याचीही चर्चा सुरू झाली आहे.