Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : चंद्रपूर–गडचिरोलीतील हत्ती संघर्षावर वडेट्टीवार आक्रमक

Desk | Gadchiroli

राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा मुद्दा विधानसभेत जोरदारपणे उपस्थित करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे तातडीने विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी केली. हा प्रश्न केवळ वन्यजीव व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी थेट संबंधित असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले. अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत हत्तींच्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, घरांचे आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. सभागृहात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सध्या ३० ते ३२ हत्तींचा कळप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सतत फिरत आहे. वन विभागाकडून हत्ती हाकलण्याचे प्रयत्न केले जात असले तरी ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याने समस्येवर कायमस्वरूपी उपाय होत नाही. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता दीर्घकालीन आणि प्रभावी धोरण आखण्याची गरज आहे.

यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात यावे आणि नागरिकांना वेळेवर इशारा देणारी प्रभावी सूचना प्रणाली विकसित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विशेष टास्क फोर्स स्थापन करून विविध विभागांमध्ये समन्वय साधला जावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.वडेट्टीवार यांनी या संघर्षामागील कारणांवरही प्रकाश टाकला. खाणकाम, जंगलातील वाढती मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक अधिवासाचे नुकसान यामुळे हत्तींचे पारंपरिक मार्ग विस्कळीत झाले आहेत. परिणामी हत्ती मानवी वस्त्यांकडे वळत असून संघर्षाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखणे आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या चर्चेला उत्तर देताना विधानसभा अध्यक्षांनीही हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे मान्य केले. मानवी जीविताचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले. चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या वनक्षेत्रालगत राहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी हा प्रश्न आता दैनंदिन जीवनाशी निगडित झाला आहे. शेतकरी, मजूर आणि ग्रामीण नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे शासनाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करून विशेष टास्क फोर्सची स्थापना करावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.