Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : मोशी प्रकरणी वडेट्टीवारांची कठोर कारवाईची मागणी हवी

Desk | Maharashtra

पिंपरी-चिंचवड येथील मोशी कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा निष्पाप मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. गरीब मजुरांच्या जीवाशी झालेला हा निष्काळजीपणाचा खेळ असह्य असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी तसेच संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली. विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, मोशी कचरा डेपोमध्ये साठवून ठेवलेल्या कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळून प्रशासकीय इमारतीवर पडला. या दुर्घटनेत सहा मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना केवळ एक अपघात म्हणून पाहता येणार नाही.

कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाची हलगर्जीपणा यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा गंभीर संशय असल्याचे त्यांनी नमूद केले. वडेट्टीवार म्हणाले की, मजुरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असते. मात्र, आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, कचऱ्याचा ढिगारा नियमानुसार साठवण्यात आला होता का, तसेच संबंधित विभागाने वेळोवेळी तपासणी केली होती का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणातील प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याची आणि संबंधित कंत्राटदार किंवा कंपनीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांनी सरकारलाही या घटनेची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले. अशा प्रकारच्या दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व कचरा डेपोची सुरक्षा तपासणी करण्यात यावी, तसेच आवश्यक सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय, मृत मजुरांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि जखमींवर शासनाच्या खर्चाने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. “गरीब मजुरांचा जीव इतका स्वस्त असू शकत नाही. निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले. मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरत आहे. आता या प्रकरणात सरकार कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.