Desk | Bhandara
जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि त्याच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, कारवाई करून दंड आकारण्यात येत असला तरी प्रत्यक्ष दंडवसुलीचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतुकीची तब्बल १४८ प्रकरणे उघडकीस आली असून, संबंधितांवर कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आकारण्यात आलेल्या दंडापैकी मोठी रक्कम अद्याप वसूल होणे बाकी आहे. जिल्ह्यात मुरूम, रेती आणि माती या गौण खनिजांच्या अवैध उत्खननाच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये महसूल आणि खनिकर्म विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार, सात महिन्यांत एकूण १४८ प्रकरणांमध्ये सुमारे १ कोटी ४२ लाख ५८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, त्यापैकी केवळ ६२ लाख १४ हजार रुपयांची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित ८० लाख ४४ हजार रुपयांची रक्कम अद्याप थकीत आहे. त्यामुळे दंड आकारणी आणि प्रत्यक्ष वसुली यामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे. रेती आणि मुरूम उत्खननाची प्रकरणे अधिक खनिजनिहाय आकडेवारी पाहता, रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीची सर्वाधिक १२९ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये सुमारे ८२ लाख ६३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी ५८ लाख ३७ हजार रुपयांची वसुली झाली आहे. तर २४ लाख २६ हजार रुपये अद्याप बाकी आहेत.
मुरूम उत्खननाच्या १४ प्रकरणांमध्ये ४९ लाख १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मात्र, यापैकी केवळ ३ लाख ७७ हजार रुपयांची वसुली झाली असून, तब्बल ४५ लाख ३३ हजार रुपये थकीत आहेत. मातीच्या अवैध उत्खननाच्या पाच प्रकरणांमध्ये १० लाख ८५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या रकमेची वसुली अद्याप झालेली नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते. १०४ गुन्हे दाखल, २८ वाहने आणि २४ यंत्रसामग्री जप्त अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने केवळ दंड आकारणीपुरती कारवाई मर्यादित ठेवलेली नाही. सात महिन्यांच्या कालावधीत १०४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली २८ वाहने आणि उत्खननासाठी वापरण्यात आलेली २४ यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या कारवायांमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात धास्ती निर्माण झाली असली, तरी दंडवसुलीचा प्रश्न अद्याप कायम आहे. दंडवसुलीला गती देण्याचे आव्हान अवैध उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच पर्यावरणावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी आणि कठोर कारवाई आवश्यक आहे. संबंधितांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांचा दंड आकारल्यानंतरही मोठी रक्कम थकीत राहणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे केवळ गुन्हे दाखल करणे आणि वाहने जप्त करणे पुरेसे नसून, आकारण्यात आलेला दंड प्रत्यक्ष वसूल करण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रभावी यंत्रणा राबवावी लागणार आहे. आगामी काळात थकीत दंडाची वसुली कितपत वेगाने होते आणि अवैध गौण खनिज उत्खननाला कितपत आळा बसतो, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
