Desk | amravati
शेतकऱ्यांच्या नावावर रेती उत्खननाचा गोरखधंदा! जोमात सुरू असल्याचा आरोप अमरावती जिल्ह्यातील रेती उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शेतकऱ्यांच्या नावावर रेती उत्खननाचा गोरखधंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. नदीच्या पात्रामुळे खचलेल्या शेतजमिनीतील गाळ व मातीमिश्रित रेती काढण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना परवानगी दिली जाते. मात्र, याच परवानगीचा गैरवापर करून रेती तस्करीचा व्यवसाय सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यासह परिसरात या प्रकाराबाबत चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नावावर उत्खननाची परवानगी मिळवून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, शेतजमिनीतील गाळ काढण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या शेतात साचलेली मातीमिश्रित रेती काढून शेतजमीन पूर्ववत करणे हा या परवानगीमागील मुख्य उद्देश आहे. मात्र, या परवानगीचा आधार घेऊन काही रेती व्यावसायिकांनी नदीपात्रातच आपला मोर्चा वळवल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर परवानगी मिळवायची आणि प्रत्यक्षात नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन करायचे, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील अधिकृत रेती घाट सुरू नसतानाही आरमोरी शहरातील बांधकामांवर ‘बिनरॉयल्टी’ रेतीचा वापर होत असल्याची चर्चा आहे. बांधकामस्थळी पोहोचणारी ही रेती नेमकी कोणत्या घाटातून आणली जाते आणि तिची रॉयल्टी भरली जाते का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तसेच बांधकामस्थळांवर साठवण्यात येणाऱ्या रेतीची कागदपत्रांसह तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मध्यरात्री पोकलेनने उत्खनन, हायवांतून नागपूरकडे वाहतूक! या संपूर्ण प्रकारात रात्रीच्या अंधारात होणाऱ्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री पोकलेन मशीनच्या साहाय्याने नदीपात्रातून रेती उपसली जाते आणि ती हायवा ट्रकद्वारे नागपूरच्या दिशेने रवाना केली जात असल्याची तक्रार आहे. दररोज हजारो ब्रास रेतीची वाहतूक होत असताना महसूल विभागाच्या रात्रीच्या गस्ती पथकांना याची चाहूल कशी लागत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याची शक्यता असून, पर्यावरणाचेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केवळ परवानगीधारक शेतकऱ्यांचीच नव्हे, तर रेतीची वाहतूक करणारे वाहनचालक, संबंधित व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज या प्रकरणात स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तहसीलदार उषा चौधरी यांच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. कथित सिंडिकेटला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे,
शेतकऱ्यांच्या नावावर दिलेल्या उत्खनन परवानग्यांचा गैरवापर होत आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, मंजूर असलेल्या रेती घाटांची व उत्खनन परवानग्यांची चौकशी करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. चौकशीत कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी यांनी सांगितले. आता जिल्हाधिकारी अभिवन पांडा यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून शासनाच्या महसुलावर डल्ला मारला जात असेल, तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कथित रेती उत्खनन प्रकरणाच्या चौकशीतून नेमके कोणाचे नाव समोर येते आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
