Desk | Chandrapur
चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला आधुनिकता, सुनियोजित नियोजन आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची जोड देत ‘न्यू चंद्रपूर’ साकारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन चंद्रपूर म्हाडा वसाहतीच्या विकास आराखड्यासंदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नवीन चंद्रपूरच्या नियोजनापासून ते पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि भविष्यातील शहरी गरजांपर्यंत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नवीन चंद्रपूर म्हाडा वसाहतीच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आले. मागील अधिवेशनात अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण केल्याबद्दल संबंधित मंत्री महोदयांचे आभारही व्यक्त करण्यात आले. नवीन चंद्रपूरचा विकास आराखडा तयार करताना केवळ सध्याच्या गरजांचा विचार न करता भविष्यातील लोकसंख्या, नागरी सुविधा आणि शहराच्या विस्ताराचा विचार करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी देशातील विकसित शहरांमध्ये काम केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेक्ट्सची मदत घेऊन आधुनिक आणि जागतिक दर्जाचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत प्रस्तावित भूसंपादन क्षेत्राची यादी, रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, नवीन वसाहतीमध्ये तब्बल ११४ अत्याधुनिक सुविधांनी युक्त अॅमेनिटीज विकसित करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर, सुनियोजित झोनिंग आणि घरांच्या बांधकामातील एकसमानता यांसारख्या बाबींचाही विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूर शहराची ओळख औद्योगिक आणि खनिज संपत्तीच्या केंद्रासोबतच प्रदूषणाच्या समस्येमुळेही आहे. त्यामुळे नवीन चंद्रपूरचा विकास करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर केवळ ‘न्यू चंद्रपूर’ नव्हे, तर ‘न्यू ग्रीन चंद्रपूर’ ही संकल्पना पुढे आली आहे. पर्यावरणपूरक सुविधा, सौरऊर्जा, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि शाश्वत नागरी विकासाच्या माध्यमातून आधुनिक शहर उभारण्याचा दृष्टिकोन या बैठकीत मांडण्यात आला. नवीन चंद्रपूर प्रकल्पामुळे भविष्यात नागरिकांना दर्जेदार घरे, नियोजनबद्ध रस्ते, आधुनिक नागरी सुविधा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, भूसंपादन प्रक्रिया आणि विकास आराखड्याला मिळणारी मंजुरी याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूरचा विकास केवळ आजच्या गरजांपुरता मर्यादित न ठेवता येणाऱ्या पिढ्यांसाठी जागतिक दर्जाचे, नियोजनबद्ध आणि प्रदूषणमुक्त शहर उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच प्रत्यक्ष संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता ‘न्यू ग्रीन चंद्रपूर’ची ही संकल्पना प्रत्यक्षात कधी उतरते आणि चंद्रपूरच्या नागरिकांना आधुनिक शहराच्या सुविधा कधी मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
