Top 5 This Week

Related Posts

BREAKING

WARDHA : कर्जमाफीची प्रतीक्षा संपेना! केवायसी करूनही शेतकरी वंचित !

Desk | wardha

नांदेडी : राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीच्या योजना जाहीर केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात अनेक पात्र शेतकरी अद्याप या लाभापासून वंचित असल्याचे समोर येत आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ न मिळाल्याने कुळुळ (एकबुर्जी) येथील शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. पात्र असूनही कर्जमाफीच्या यादीत नाव समाविष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना २०२१ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा आणि आगामी हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मारुती बटकर आणि हेमराज शंकर बटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. कुळुळ (एकबुर्जी) येथील मारुती बटकर आणि हेमराज बटकर या दोन्ही शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या हंगामात बँक ऑफ महाराष्ट्रच्या नांदेडी शाखेतून पीककर्ज घेतले होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे दोन्ही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. दरम्यान, शासनाकडून २०२६ मध्ये कर्जमाफीसंदर्भातील यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत दोन्ही शेतकऱ्यांची नावे समाविष्ट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जुलै २०२६ मध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, केवायसी करून चार महिने उलटूनही अद्याप त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ नेमका कधी मिळणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. परिसरातील इतर पात्र शेतकरीही लाभापासून वंचित केवळ दोन शेतकऱ्यांचाच प्रश्न नसून नांदेडी परिसरातील इतरही अनेक पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या निकषांनुसार पात्र असतानाही यादीत नावे नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीचे नुकसान, कर्जाचा वाढता बोजा आणि पुढील हंगामासाठी लागणारा खर्च यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी कर्जमाफीसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ मिळत नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची शासनाने गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांचा तातडीने समावेश करावा. तसेच संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा आणि आगामी शेती हंगामासाठी आवश्यक पीककर्ज मंजूर करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने केवळ योजना जाहीर न करता त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण करूनही लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का आणि प्रशासन या प्रकरणात किती लवकर निर्णय घेणार, याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.