Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GADCHIROLI : डी.ओ. मिळेना, नवीन हंगामातील धान खरेदी रखडली!.

Desk | Gadchiroli

शासनाकडून धान्याची उचल करण्यासाठी आवश्यक असलेला डी.ओ. (डिलिव्हरी ऑर्डर) प्राप्त न झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रांगी येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील हंगामातील तब्बल १४ हजार ४९८ क्विंटल धान अद्याप पडून आहे. धानाची उचल न झाल्यामुळे नवीन हंगामातील धान खरेदी सुरू करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, परिसरातील शेतकरी आणि धान खरेदी केंद्र चालविणाऱ्या संस्थांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन धानाची उचल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रांगी परिसरात शासनाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्र चालविले जाते. या केंद्रावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले जाते. मात्र, मागील हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक असलेला डी.ओ. अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान केंद्रावरच साठवून ठेवावे लागले आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे केंद्रावर साठवून ठेवलेल्या धानाला मोठा फटका बसला आहे. धानाच्या पोत्यांमध्ये पाणी शिरल्याने काही धान भिजून काळे पडले आहे. परिणामी, धानाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीने उत्पादित केलेल्या धानाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवीन हंगामातील धान खरेदी सुरू होण्यापूर्वीच जुन्या धानाची उचल न झाल्याने साठवणुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सध्या परिसरात नवीन धान कापणी आणि मळणीची कामे पूर्ण होत असून, शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी तयार करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी हलक्या व मध्यम जातीच्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण केली आहे.

मात्र, शासकीय धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रांगी केंद्रावर मागील हंगामातील धानाचा मोठा साठा असल्याने नवीन धान साठविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. धानाची उचल वेळेत झाली असती, तर नवीन हंगामातील धान खरेदी सुरळीतपणे सुरू करता आली असती. मात्र, प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे शेतकऱ्यांसह खरेदी केंद्र चालविणाऱ्या संस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रांगी येथील केंद्रावर पडून असलेल्या १४ हजार ४९८ क्विंटल धानाची संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उचल करावी. तसेच शासनाने आवश्यक डी.ओ. मंजूर करून धानाची वाहतूक लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. नवीन हंगामातील धान खरेदीला विलंब झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. जुन्या धानाची उचल आणि नवीन धान खरेदी सुरू करण्याबाबत शासन व संबंधित विभागाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.