Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BHANDARA : मुलींच्या जन्माचे होणार जल्लोषात स्वागत!

Desk | Bhandara

भंडारा  जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील (सिहोरा) येथे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ग्रामपंचायतीने एक अनोखा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालिकेला १ ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे परिसरातून स्वागत होत असून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावातील मुलींच्या जन्माचे आनंदाने स्वागत करण्याची नवी परंपरा सुरू होणार आहे. अनेक ठिकाणी आजही मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, मुलगी ही कुटुंबाचा आणि समाजाचा अभिमान आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना शिक्षणासह जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालिकेला १ ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे. यासोबतच मुलींच्या उच्च शिक्षणासाठीही ग्रामपंचायतीने विशेष तरतूद केली आहे. गावातील ज्या मुली उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणार आहेत, त्यांना ९ हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे मुलींचे शिक्षण थांबू नये आणि त्यांना आपल्या स्वप्नांना गवसणी घालता यावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य

निर्णयाबाबत बोलताना ग्रामपंचायतीचे सदस्य शिरिलाल नागपुरे यांनी सांगितले की, नवजात बालिकेला सोन्याची अंगठी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गावातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आर्थिक मदतही दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षणाला आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. सरपंच यशवंत उपरीकर, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे इतर सदस्य या उपक्रमासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांचा सन्मान, मुलींचे शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. केवळ मुलींच्या जन्माचा आनंद साजरा करणे नव्हे, तर त्यांच्या भविष्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत करण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुलगी जन्माला येणे ही आनंदाची बाब आहे आणि तिला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवणे ही समाजाची जबाबदारी आहे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.