Top 5 This Week

Related Posts

BREAKING

LATUR : महाराष्ट्रात दुष्काळाचे भीषण संकट! लातुरात 12 एकर ऊस करपला !

Desk | latur 

महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्याचा मोठा फटका आता खरीप पिकांपाठोपाठ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा पट्ट्यात पाण्याअभावी उसाची शेती पूर्णपणे वाळून गेल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, लातूर तालुक्यातील भातांगळी शिवारातील एका शेतकऱ्याचा तब्बल 12 एकर ऊस पाण्याअभावी करपून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या शेतकऱ्याने उसाच्या पिकासाठी मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, पाणीच उपलब्ध न झाल्याने संपूर्ण पीक वाया गेले. उसाला कांडीही भरली नसल्यामुळे एकरी दोन टन उत्पादन मिळणेही कठीण झाले आहे. यापूर्वी या शेतात एकरी जवळपास 60 टन ऊस उत्पादन होत होते. मात्र, यंदा उत्पन्न शून्यावर आले आहे. त्यातच वाळलेला ऊस नेण्यासाठी साखर कारखानेही तयार नसल्याने शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली आहे. या शेतकऱ्याने पाण्यासाठी 550 ते 560 फूट खोल दोन बोअरवेल खोदल्या, ठिबक आणि स्प्रिंकलरचा वापरही केला. मात्र, पाणी न मिळाल्याने सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शेतकऱ्याच्या कुटुंबात सहा मुली असून, चार मुलांच्या शिक्षणासह दोन मुलींच्या लग्नाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे शासनाने पूर्वी मिळणाऱ्या उत्पन्नाच्या किमान 75 टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या उर्वरित 227 कोटी रुपयांचा प्रश्नही चर्चेत आला आहे. 2019-20 मधील पीक विम्यापोटी विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचे 600 कोटी रुपये थकीत होते. यापैकी 376 कोटी रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, उर्वरित 227 कोटी रुपयांसाठी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, 14 तारखेला अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 9 हजार रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुष्काळाचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर वयोवृद्ध महिलांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. काही महिलांनी वयाची नव्वदी आणि शंभरी ओलांडली असतानाही उदरनिर्वाहासाठी शेतात मजुरी करण्याची वेळ आली आहे. शेतात काम मिळत नाही, घरात पाणी आणि खाण्यापिण्याची अडचण आहे, तर मिळणारी मजुरीही जेमतेम 300 रुपये आहे. एका 90 वर्षीय महिलेने 1972 चा दुष्काळ पाहिल्याचे सांगत, पुन्हा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची व्यथा मांडली. वाढत्या महागाईमुळे बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करणेही कठीण झाले आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसेही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. या वयात गुडघ्यांच्या त्रासासह काम करावे लागत असून, सरकारने दर महिन्याला ठरावीक आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे शेतातील पिके वाळत आहेत, तर दुसरीकडे ज्येष्ठ महिलांना पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू कुटुंबांना केवळ घोषणांऐवजी नियमित आर्थिक मदत, रोजगार आणि पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.