Top 5 This Week

Related Posts

BREAKING

WARDHA : कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवून दाखवले७० लाखांच्या अपहाराचा आरोप

Desk | Wardha

जिल्हा परिषदेमधील महिला व बालविकास विभागात आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित नोंदींमध्ये कथित फेरफार करून तब्बल ७० लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, समृद्धीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या पगारात अनधिकृत वाढ करून ही रक्कम लाटण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागांतर्गत समृद्धीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संबंधित विभागातील लिपिक अभिषेक जगताप यांचे नाव समोर आले आहे. त्यांनी कथितरीत्या स्वतःच्या पदाचा आणि कार्यालयीन कामकाजाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांच्या वेतन नोंदींमध्ये बदल केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, संबंधित कर्मचाऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या वेतनापेक्षा अधिक रक्कम देय असल्याचे दाखवून ही वाढीव रक्कम मंजूर करून घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर वेतनाच्या माध्यमातून सरकारी निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकारात सुमारे ७० लाख ५ हजार ११० रुपयांचा अपहार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, संबंधित लिपिकाने ऑनलाइन पद्धतीने वेतन देयकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या नोंदी तयार करणे आणि त्या शासनाकडे सादर

करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयीन यंत्रणेवर असते. मात्र, याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत सरकारी तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर संबंधित कार्यालयात एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांच्या वेतन नोंदी, मंजुरी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणात नेमका किती निधी वळवण्यात आला, त्याचा लाभ कोणाला झाला आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती देण्यात टाळाटाळ? या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील अंतर्गत कारभाराबाबत संशय अधिकच वाढला आहे. शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये अशा प्रकारे कथित गैरव्यवहार होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, संबंधित आर्थिक नोंदींची तपासणी कशी केली जाते आणि कथित अपहाराची रक्कम वसूल करण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला व बालविकास विभागातील या कथित ७० लाखांच्या सॅलरी स्कॅममुळे वर्धा जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.