Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AMRAVATI : अंडा करी न दिल्याने परिचिताचा संताप; हॉटेल चालकावर हल्ला !

Desk | amravati

अमरावती : हॉटेल बंद झाल्यामुळे अंडा करी देता येणार नसल्याचे सांगितल्याने संतापलेल्या एका परिचित युवकाने हॉटेल चालकाला बोलावून त्याच्यावर धारदार वस्तूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत समोर आली आहे. या हल्ल्यात हॉटेल चालकाच्या खांद्याला दुखापत झाली असून, याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशराज समकर (वय २८, रा. बुटे प्लॉट, सामरा नगर) हे परिसरात ‘चस्का हॉटेल’ नावाने भोजनालय चालवतात. त्यांचे हॉटेल दररोज सायंकाळी ४ वाजता सुरू होते, तर रात्री ११ वाजता बंद होते. या हॉटेलमध्ये कुटुंबांसाठी जेवणाचीही व्यवस्था आहे. ३१ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास यशराज समकर हॉटेल बंद करत होते. त्याचवेळी आदित्य तांबट नावाचा त्यांचा परिचित युवक अंडा करी घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला. मात्र, त्यावेळी हॉटेल बंद झाले होते. तसेच स्वयंपाक करणारे कर्मचारीही तेथून निघून गेले होते. त्यामुळे यशराज यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगत अंडा करी देणे शक्य नसल्याचे त्याला स्पष्ट केले. त्यानंतर आदित्य तेथून निघून गेला. मात्र, अंडा करी न मिळाल्याचा राग मनात धरून आदित्यने दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता यशराज यांना फोन केला. राजापेठ पोलीस ठाण्याजवळील आपल्या घरासमोर भेटण्यासाठी त्याने त्यांना बोलावून घेतले. फोन आल्यानंतर यशराज हे आपला मित्र यश साहू याच्यासोबत चारचाकी वाहनातून संबंधित ठिकाणी पोहोचले. यावेळी ते आदित्यच्या घराजवळील गेट उघडून त्याच्याशी बोलत असतानाच अचानक आदित्यने कात्रीसारख्या धारदार वस्तूने त्यांच्या खांद्यावर वार केला. या हल्ल्यात यशराज यांच्या खांद्याला दुखापत झाली. यशराज यांनी हल्ल्याचा विरोध केला असता, आरोपीने त्यांच्याशी शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अंडा करी न दिल्याच्या कारणावरूनच आरोपीने आपल्यावर हल्ला केल्याचे यशराज यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. घटनेनंतर घाबरलेल्या यशराज यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.