Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BHANDARA : भंडाऱ्यात सफाई कामगारांचे जलसमाधी आंदोलन!

Desk | Bhandara

भंडारा नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांचा गेल्या ६६ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या सफाई कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी कामगारांनी थेट वैनगंगा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान तीन आंदोलकांनी नदीपात्रात उड्या घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. भंडारा नगरपरिषदेच्या कंत्राटदाराकडे सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप आहे. याविरोधात संबंधित कामगार मागील ६६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. सोमवारी सकाळपासून वैनगंगा नदीपात्रात हे आंदोलन सुरू झाले. यावेळी आंदोलक बोटीच्या माध्यमातून नदीपात्रात उतरले होते. आंदोलनादरम्यान सकाळी सुमारे ९ वाजून ३९ मिनिटांच्या सुमारास तीन कामगारांनी बोटीतून थेट नदीच्या पाण्यात उड्या घेतल्या. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली. काही वेळानंतर हे कामगार पुन्हा बोटीवर आले. या घटनेनंतर आंदोलनाचे गांभीर्य आणखी वाढले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा करण्यात आली. कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याबाबत आश्वासन देत नगरपरिषदेकडून पत्रही देण्यात आले. मात्र, केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कामावर रुजू करून घेण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न असूनही आंदोलन तातडीने मागे घेण्यात आले नाही. रात्री साडेआठ वाजेपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे.

या आंदोलनात एकूण ५९ सफाई कामगार सहभागी झाले होते. यापैकी सुमारे ३० कामगार दोन बोटींच्या माध्यमातून नदीपात्रात बसले होते, तर इतर कामगार नदीच्या काठावर आंदोलनाला पाठिंबा देत होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी नदीकाठावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. काय आहेत कामगारांच्या प्रमुख मागण्या? कामावरून कमी करण्यात आलेल्या सर्व सफाई कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, मजुरीबाबत स्पष्ट आणि योग्य निर्णय घ्यावा, तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून कामगारांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रश्न सोडवावेत, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. गेल्या ६६ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघत नसल्याने संताप वाढत आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, तसेच सफाई कामगारांना पुन्हा काम मिळणार का, याकडे आता भंडारा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.