Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AMRAVATI : अचानक न्यायालय रिकामं केलं; शेकडो पोलीस कर्मचारी तैनात !

Desk | amravati

अमरावती : अमरावती जिल्हा न्यायालयात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून मॉक ड्रिल घेण्यात आली. या मॉक ड्रिलदरम्यान न्यायालयाच्या दोन्ही इमारती अचानक रिकाम्या करण्यात आल्या. न्यायालयातील वकील, कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांनाही तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले. अचानक घडलेल्या या कारवाईमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण कारवाईसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) सह शेकडो पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय पोलीस उपायुक्त प्रांजल सोनवणे आणि यशवंत सोलंकी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था उभी केली होती. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाला धमकीचे ई-मेल मिळाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यातील विविध न्यायालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा न्यायालयात पोलिसांनी विशेष सतर्कता दाखवत सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घेतली. न्यायालय परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवणे, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधला जातो, याची तपासणी या मॉक ड्रिलच्या माध्यमातून करण्यात आली. या कारवाईदरम्यान न्यायालयातील सर्व संबंधितांना बाहेर काढून सुरक्षा यंत्रणांनी आपली तयारी तपासली. QRT पथक, स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दल यांच्यातील समन्वयाचीही चाचणी घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत कोणताही विलंब न होता तातडीने मदत पोहोचावी, हा या सरावामागील मुख्य उद्देश होता.

मात्र, या संपूर्ण कारवाईबाबत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्पष्टीकरण देत ही प्रत्यक्ष घटना नसून पोलिसांकडून घेण्यात आलेली मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट केले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलीस आणि संबंधित यंत्रणा कितपत सज्ज आहेत, हे तपासण्यासाठी हा सराव करण्यात आला होता. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिक, वकील आणि कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. अमरावती पोलिसांच्या या मॉक ड्रिलमुळे न्यायालयाच्या सुरक्षेच्या तयारीची चाचणी घेण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले.