Desk | nagpur
नागपूर : स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य उभारण्यासाठी वाघ कितीही लांबचा प्रवास करू शकतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा विदर्भात आला आहे. उमरेड-करांडला अभयारण्यात जन्मलेल्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या एका वाघाने तब्बल १५० किलोमीटरचा प्रवास करत वन्यजीवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रवास करताना त्याने मानवी वस्ती टाळली असून, वन्यजीवांच्या सुरक्षित मार्गिकेचा म्हणजेच टायगर कॉरिडॉरचा वापर केला आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या उमरेड-करांडला अभयारण्यात एफ-२ या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. याच पाच बछड्यांपैकी सर्वात लहान असलेल्या बछड्याने आता आईपासून वेगळं होत स्वतःचा अधिवास निर्माण करण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. वयात आल्यानंतर स्वतःचं स्वतंत्र क्षेत्र शोधण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. या वाघाने उमरेड-करांडला अभयारण्यातील गोठणगाव परिसरातून आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर जवळपास १५० किलोमीटर अंतर पार करत तो पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली परिसरात पोहोचला आहे. २९ ऑक्टोबर रोजी या वाघाचे चोरबाहुली परिसरात दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा या भागात मुक्काम असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एवढे मोठे अंतर पार करताना या वाघाने एकदाही नागरी वस्तीमध्ये प्रवेश केला नाही. त्याने मानवी वस्तीपासून दूर राहत जंगल आणि जंगलांना जोडणाऱ्या टायगर कॉरिडॉरमधूनच आपला मार्ग शोधला. त्यामुळे उमरेड-करांडला अभयारण्य आणि पेंच व्याघ्र प्रकल्प यांच्यातील वन्यजीव मार्गिका प्रभावीपणे कार्यरत असल्याचे अधोरेखित झाले आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी अशा कॉरिडॉरचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी वाघांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्यास त्यांना नवीन अधिवास शोधणे, स्वतःचे क्षेत्र निर्माण करणे आणि प्रजननासाठी योग्य वातावरण मिळवणे शक्य होते. या वाघाने केलेला १५० किलोमीटरचा प्रवास याच नैसर्गिक प्रक्रियेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
दरम्यान, वनविभागाचे पथक या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. चोरबाहुली परिसरात पोहोचल्यानंतर हा वाघ पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातच आपला कायमस्वरूपी अधिवास निर्माण करणार का, की पुढे मध्य प्रदेशच्या दिशेने आणखी प्रवास करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत त्याच्या हालचालींवरून पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, आईपासून दूर होऊन स्वतःचे साम्राज्य उभारण्यासाठी १५० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या तरुण वाघाने पुन्हा एकदा विदर्भातील समृद्ध वनसंपदा आणि वन्यजीव कॉरिडॉरचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
