Desk | amravati
अमरावती : अमरावती शहरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या १४ चाकी ट्रकवर धडक कारवाई करत तब्बल २३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व्हॅली लॉन परिसरात अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तहसील कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्यांना सोबत घेत संबंधित ठिकाणी पाहणी केली. यावेळी संशयित १४ चाकी ट्रकची तपासणी केली असता, कोणताही वैध परवाना नसताना मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रकसह रेतीचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे २२ लाख रुपये किमतीचा १४ चाकी ट्रक आणि १ लाख ८० हजार रुपये किमतीची ५६ टन रेती असा एकूण २३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात जेनुल आबेदीन अब्दुल कय्यूम (रा. पोरगव्हाण), शफिक खान रफिक खान (रा. अमरावती) आणि रिजवान हुसेन शौकत हुसेन फरात यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तर अब्दुल अलीम अब्दुल गणी हा आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वाहनचालक आणि संबंधित व्यक्तींविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध रेती वाहतुकीच्या माध्यमातून शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, शहरातील अवैध रेती वाहतूक आणि अनधिकृत व्यवसायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्तांनी केले असून, गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी संयुक्तपणे ही यशस्वी कारवाई पार पाडली. अमरावती शहरात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
