Top 5 This Week

Related Posts

BREAKING

WASHIM : समृद्धी महामार्गावर आंदोलनाचा इशारा; पोलिसांची मोठी तयारी !

WASHIM |

वाशिम : अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाच्या शेलूबाजार इंटरचेंज परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठाकरे गटाचे शिवसेना नेते नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत सरकारला समृद्धी महामार्ग बंद पाडण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलन गांभीर्याने घेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या आंदोलनासाठी वाशिम जिल्ह्यासह परिसरातील पाच जिल्ह्यांमधून जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी अशा मोठ्या यंत्रणेची नियुक्ती करण्यात आली आहे. कालपासूनच या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने शेलूबाजार परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. वाशिमच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एक पोलीस अधीक्षक, सुमारे १५० पोलीस अधिकारी आणि जवळपास १,८०० पोलीस अंमलदार अशा प्रकारे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती तयारी केली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या एसओपीप्रमाणे बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील जवळपास ४०० जणांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी, या मागणीवर ठाकरे गटाची शिवसेना ठाम आहे.

नितीन देशमुख आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलनाला नेमके कोणते स्वरूप प्राप्त होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा प्रश्न, सरकारची भूमिका आणि समृद्धी महामार्ग बंद पाडण्याचा दिलेला इशारा यामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासन आणि सरकारसमोर कोणते आव्हान उभे राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.