Desk | wardha
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे ऑर्डनन्स फॅक्ट्री अंबाझरीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अखेर पुलगाव पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अखिल गाडगे (रा. कवठा झोपडे) यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ऑर्डनन्स फॅक्ट्री अंबाझरी येथे नोकरी लावून देतो, असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून 12 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे मे 2025 मध्ये पुलगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी राजीव हिरास्वामी रेड्डी (रा. मानकापूर, नागपूर) हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र, तो वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, पुलगाव पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 29 ऑक्टोबर रोजी पहाटे नागपूर येथून राजीव रेड्डी याला अटक केली. दीर्घकाळापासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखिले आणि पुलगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके, पोलीस अंमलदार अमोल आडे, सिद्धू सोमकुंवर आणि मयुरी झोपाटे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीने नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन मागील आठ वर्षांत इतर आरोपींच्या मदतीने अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. या प्रकरणांपैकी अनेक गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या आरोपीच्या अटकेनंतर आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचा तपास होण्याची शक्यता आहे.
नोकरी मिळवण्याच्या आशेने अनेक तरुण आणि बेरोजगार नागरिक अशा आमिषांना बळी पडतात. सरकारी किंवा नामांकित संस्थांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींना कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून अधिकृत खात्री करणे आवश्यक आहे. पुलगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश होण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते आणि या फसवणुकीत इतर कोणाचा सहभाग आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
