Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : MPSC विद्यार्थ्यांचा निर्धार कायम; राजीनाम्याशिवाय माघार नाही !

Desk | pune

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज अकरावा दिवस असून, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिल्याने या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदावरून विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी १ तारखेपासून पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अकरा दिवसांपासून विद्यार्थी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. राज्य सरकारने या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे. जोपर्यंत सरकारकडून विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आंदोलनादरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांत काही विद्यार्थ्यांनी उपोषणही सुरू केले होते. मात्र, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले. उपोषण थांबले असले, तरी मुख्य आंदोलन अद्याप सुरूच आहे. विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत काही विद्यार्थ्यांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, गुन्हे दाखल झाले तरी आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अद्याप ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसल्याची नाराजीही आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ येईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वी शिष्टमंडळ विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याची अपेक्षा होती; मात्र आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अद्याप त्यांच्या मागणीवर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला असून, विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी हाच आंदोलनाचा मुख्य मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, रोहित पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी रोहित पवार आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याने या आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेते का आणि त्यांच्या मागणीवर तोडगा काढते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले हे आंदोलन आणखी किती दिवस चालणार आणि राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.