Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GADCHIROLI : धानाची उचल रखडली, आता संस्थांकडून लाखोंची वसुली !

Desk | gadchiroli

कुरखेडा : आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी प्रक्रियेत जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संस्थांच्या समस्या तातडीने सोडवून धान खरेदी केंद्रे सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने सुरू करावीत, अशी मागणी शिंदेसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिंदेसेनेचे आमगोरी क्षेत्र जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिला आहे. आदिवासी महामंडळाच्या नियोजनाअभावी जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना धान खरेदी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नियमानुसार खरेदी केलेले धान दोन महिन्यांच्या आत उचलून मिलर्सकडे पाठविणे किंवा अन्य गोदामात साठविणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक धान खरेदी केंद्रांवर वर्षभर आणि त्यापेक्षाही अधिक काळ धानाच्या पोत्यांचा साठा पडून राहत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी महामंडळाकडून संस्थांना कमिशनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या संस्थांसमोर आणखी मोठे संकट निर्माण झाले आहे. केंद्रांवर दीर्घकाळ पडून राहिलेल्या धानातील घट आणि तुटीबाबत संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने संस्थांचे पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत. यंदा तर घट व तूट दाखवून संस्थांना दोषी ठरवत ३० ते ३५ लाख रुपयांच्या वसुलीचे लेखी आदेश देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढी मोठी रक्कम संस्थांनी भरायची कशी, असा प्रश्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे धानाची उचल वेळेत होत नाही, तर दुसरीकडे धानातील घट आणि तुटीची जबाबदारी संस्थांवर टाकली जात असल्याने संस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान, मागील वर्षी तसेच त्यापूर्वी खरेदी केलेले धान अनेक केंद्रांवर अद्याप पडून आहे. दोन वर्षांपासून धान खरेदी केंद्रांवर धानाचा साठा कायम असल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी होणारे धान साठवायचे कुठे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन धान खरेदीसाठी जागाच उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महामंडळाच्या नियोजनाअभावी संस्थांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मागील हंगामातील धानाची तातडीने उचल करावी, अशी मागणी शिंदेसेनेने केली आहे.

तसेच वर्षभर केंद्रांवर पडून राहिलेल्या धानाचा कमी दरात ई-लिलाव केला जातो. मात्र, लिलावातील धानाची पोती उचलणे आणि हमालीचे कमिशनही संस्थांना मिळत नसल्याची तक्रार आहे. या सर्व समस्यांमुळे आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे कामकाज प्रभावित होत असून, संस्थांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन धान खरेदी केंद्रांवरील प्रलंबित धानाची उचल करावी, संस्थांचे थकीत कमिशन द्यावे आणि अन्यायकारक वसुलीचे आदेश मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. संस्थांच्या समस्या तातडीने सोडवून धान खरेदी केंद्रे येत्या तीन ते चार दिवसांत सुरू करावीत. अन्यथा हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शिंदेसेनेने दिला आहे.