Desk | bhandara
भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे शेतजमिनीतील ओलावा कमी झाला असून धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर आला आहे. स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तुमसर तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. तसेच तुमसर आणि मोहाडी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त किंवा ट्रिगर-वनच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार उपेश अंबादे यांना निवेदन देण्यात आले. पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तुमसर आणि मोहाडी परिसरात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतांमध्ये पुरेसा ओलावा राहिलेला नाही. त्यातच विविध किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचे नुकसान वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पिके सुकून जात असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असताना तुमसर आणि मोहाडी तालुक्यांचा अद्याप दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नाही, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. पावसाची स्थिती आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन या दोन्ही तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पिकांचे नुकसान होत असतानाही अद्याप पुरेशा प्रमाणात पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदार उपेश अंबादे यांनी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाची दखल घेतली. विविध रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्याबाबत निवेदने प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आवश्यक कारवाईसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवर प्रशासन आणि शासन काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीने मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
