Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BHANDARA : तंबाखू सेवनाविरोधात आरोग्य विभागाची मोठी जनजागृती मोही.

Desk | Bhandara

तंबाखू सेवनाच्या वाढत्या व्यसनाला आळा घालण्यासाठी भंडारा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ७ हजार ६४९ नागरिकांचे तंबाखू सेवन सोडण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी १७५ जणांनी तंबाखूचे व्यसन पूर्णपणे सोडले आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांबाबत जनजागृती करण्याबरोबरच कर्करोगाचे लवकर निदान करण्यावरही आरोग्य विभागाने विशेष भर दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर उपक्रम राबविले जात आहेत. ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १० ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून तंबाखूविरोधी जनजागृती, तपासणी आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी यासाठी मोबाइल मेडिकल व्हॅनच्या माध्यमातूनही तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. तंबाखू सेवनामुळे तोंडाचा, घशाचा तसेच अन्य प्रकारचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्या नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना व्यसन सोडण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

या मोहिमेदरम्यान तंबाखू नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८०४ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जनजागृतीसोबतच नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे. दरम्यान, तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावे यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात आली. मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगासाठी एकूण २ लाख १७ हजार ७३० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २१९ जणांना कर्करोगाचे निदान झाले असून त्यापैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुख कर्करोगाच्या तपासणीमध्ये १ लाख २ हजार ४७४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १४६ रुग्ण आढळून आले असून १३८ जणांवर उपचार सुरू आहेत. तालुकानिहाय पाहता पवनी, लाखांदूर, साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडी आणि लाखनी येथेही रुग्ण आढळले आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष तपासणी करण्यात आली. स्तन कर्करोगासाठी ५१ हजार ८९५ महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ५६ महिलांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यापैकी ५५ महिलांवर उपचार सुरू आहेत. तसेच गर्भाशय मुख कर्करोगासाठी ६३ हजार ८१ महिलांची तपासणी करण्यात आली असून १७ रुग्णांचे निदान झाले आहे. तंबाखूचे सेवन टाळणे आणि व्यसन लागले असल्यास ते वेळीच सोडणे हाच कर्करोगापासून बचावाचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. समुपदेशन, नियमित तपासणी आणि जनजागृती यामुळे तंबाखूमुक्त समाजाच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत आहे. मात्र, तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि प्रशासनाकडून सातत्यपूर्ण जनजागृती आवश्यक आहे.