Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BHANDARA : भंडाऱ्यात 63 हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

Desk | Bhandara

रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण अद्यापही चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. वाहतूक विभागाने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात सातत्याने कारवाईचा बडगा उगारला असला, तरी मोठ्या संख्येने नियमभंगाची प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६३ हजार ८५३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहन चालविताना हेल्मेट, सीट बेल्ट, वेगमर्यादा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर तसेच इतर वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक वाहनचालक या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. विशेषतः दुचाकीस्वारांकडून हेल्मेट न वापरण्याचे प्रमाण मोठे असल्याचे वाहतूक विभागाच्या कारवाईतून स्पष्ट होते. भंडारा जिल्ह्यातील वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईमध्ये हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वेगाने वाहन चालविणे तसेच इतर नियमभंगाच्या प्रकरणांचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अपघातांत घट, मृत्यूचे प्रमाणही कमी वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा परिणाम अपघातांच्या आकडेवारीतही दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२५ मध्ये २७१ अपघात झाले होते, तर २०२६ मध्ये त्याच कालावधीत २२४ अपघातांची नोंद झाली. प्राणांतिक अपघातांची संख्या २०२५ मध्ये १०४ होती, तर २०२६ मध्ये ती ६९ इतकी झाली. मृत्यूंच्या संख्येतही घट झाली असून २०२५ मध्ये ११४ मृत्यू, तर २०२६ मध्ये ५९ मृत्यू नोंदविण्यात आले. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी केवळ दंडात्मक कारवाईवर अवलंबून न राहता वाहनचालकांनी स्वतःहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सीट बेल्टकडेही दुर्लक्ष चारचाकी वाहनचालकांकडून सीट बेल्टचा वापर करण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे कारवाईतून दिसून आले आहे. सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी हजारो वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी सीट बेल्ट हा जीव

वाचविण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे वाहनचालकांनी वाहन सुरू करण्यापूर्वी सीट बेल्ट लावण्याची सवय लावणे गरजेचे आहे. याशिवाय ड्रंक अँड ड्राइव्हच्या २ हजार ८३३ प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली आहे. दारू पिऊन वाहन चालविणे हा स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारा गंभीर प्रकार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरूच राहणार असली, तरी रस्ते सुरक्षित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. हेल्मेट आणि सीट बेल्टचा नियमित वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे यामुळे अपघातांचे प्रमाण आणखी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे “कारवाईची भीती” म्हणून नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.