Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AKOLA : पावसाने दडी मारली, पिकांचे नुकसान; अकोल्यात शेतकरी आक्रमक

Desk | Akola

पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढला. उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हा मोर्चा काढण्यात आला. हातात करपलेली पिके आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील सागर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह आणि पंचायत समिती मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या शेतकरी धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. मोर्चाच्या समारोपावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पावसाच्या खंडामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या खरीप पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह विदर्भात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, पीकविमा योजनेतील अटी शिथिल करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच सिंचन सुविधा असलेल्या भागातील कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशा मागण्या निवेदनातून

करण्यात आल्या आहेत. कृषी पंपांसाठी २४ तास कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच पुनर्गठित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला. त्यामुळे शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे आता शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. मोर्चानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने अकोल्यात शेतकरी प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.